संगीत हे मनाला प्रसन्न करणारे, मनोरंजन करणारे साधन आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कला असते. वाद्य वाजवणे ही देखील एक कला आहे आणि बरेच जण ही कला जोपासतात आणि बहुतांश घरामध्ये ही वाद्ये असतात.
ईशान्य दिशा ही देवघर ठेवण्याची एकमेव दिशा आहे, असा संभ्रम आपल्याला दिसून येतो.
ही वाद्ये योग्य दिशेत ठेवली तर त्यांचा योग्य उपयोग होतो. अन्यथा वाद्य घरामध्ये वर्षानुवर्षे पडून राहते आणि त्याची अडगळ निर्माण होते. असे होऊ नये म्हणून वाद्ये योग्य दिशेत ठेवावीत.
खरे पाहिले तर वास्तुमध्ये मनोरंजनासाठी एक वेगळा झोन आहे. तो म्हणजे पूर्व-उत्तर-पूर्व (ENE) म्हणजेच या झोनमध्ये वाद्ये ठेवलीत तर त्यापासून आपल्याला पाहिजे तसा आनंद मिळू शकतो. परिस्थिती कशीही असो या घरातील व्यक्ती सतत आनंदी दिसून येते.
पूर्व झोनमध्ये (E) जर आपण वाद्य ठेवले तर हे प्रोफेशनल कार्यक्रम करणारे, जे लोक आहे त्यांच्यासाठी चांगले मानले गेले आहे. येथे वाद्य ठेवल्यास करिअरमध्ये चांगली प्रगती होते.
परंतु पूर्व-दक्षिण-पूर्व (ESE) या भागात वाद्ये ठेवू नये. इथे ठेवलेली वाद्ये उगीचच पडून राहतात व कालांतराने ती खराब होतात.
दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय (SE) भागात ठेवलेले वाद्य आपल्याला धन आकर्षित करण्यास मदत करते.
दक्षिण (S) क्षेत्रात ठेवलेले वाद्य आपले आध्यात्मिक शक्ती वाढवते तसेच सखोल वाद्य अभ्यासात आपले मन रमते.
दक्षिण-दक्षिण-पश्चिम (SSW) क्षेत्रात ठेवलेली वाद्य आपल्याला निरर्थक भावनांच्या कल्लोळातून मुक्ती देते व संगीतामध्ये खोलवर रुची उत्पन्न करते.
दक्षिण-पश्चिम म्हणजेच नैऋत्य (SW) क्षेत्रात ठेवलेले वाद्य आपली खूप चांगली प्रगती घडवते. त्या वाद्याबद्दलची आपली रुची वाढत जाऊन आपण त्या क्षेत्रात तरबेज होतो.
जर आपल्याला संगीताचा निरंतर अभ्यास करायचा आहे व त्यामध्ये महारथ मिळवायची आहे तर आपण आपले वाद्य पश्चिम-दक्षिण-पश्चिम (WSW) क्षेत्रात ठेवावे.
जर आपण आर्थिक प्राप्तीसाठी वाद्ये वाजवत असू तर आपण ते पश्चिम (W) क्षेत्रात ठेवल्यास अति उत्तम मानले गेले आहे. याद्वारे आपले मित्र देखील वाढतात आणि ती कला लवकर ग्रहण होण्यास मदत होते.
पश्चिम-उत्तर-पश्चिम (WNW) या क्षेत्रात जर वाद्य ठेवले तर शिक्षणात अडथळे येतात. तुम्हाला संगीत येत नाही किंवा जमत नाही या विचारांनी तुम्ही सतत ग्रासलेले असता.
उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य (NW) क्षेत्रात वाद्य ठेवले तर ना काही फायदा होतो ना तोटा.
जर उत्तर-उत्तर-पश्चिम (NNW) मध्ये वाद्य ठेवले तर विरुध्द लिंगी व्यक्तीला आकर्षित करण्यात यश मिळते.
उत्तर (N) क्षेत्रात ही वाद्ये ठेवली तर यामध्येच करिअरच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त होतात आणि त्यांची प्रगती होते.
उत्तर-उत्तर-पूर्व (NNE) क्षेत्रात जर वाद्य ठेवले तर ते हिलींग सारखे काम करते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहते शिवाय आरोग्याविषयी जागृत राहण्यास देखील मदत करते.
जर उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य (NE) क्षेत्रात जर वाद्य ठेवली तर मानसिक ताण येतो व वाद्य वाजवण्याची इच्छाशक्ती संपून जाते.
आपल्या घरात अशाप्रकारे वाद्य ठेवण्याची जागा शिथिल करुन मनोरंजनाचा मनसोक्त आनंद लुटावा.